शनिवार, १५ जुलै, २०२३

दमडी बालभारती | Damadi Balbharti




 अडीच-तीन वाजण्याची वेळ. बर्डीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता व त्याच्या पलीकडे चिंचेचे एक विस्तीर्ण झाड होते. त्याच्याखाली दमडी निजली होती. त्या झाडाच्या वाकड्यातिकड्या पसरलेल्या जीर्ण मुळ्यांवर तिने डोके ठेवले होते. धुळीने धूसर झालेल्या तिच्या झिपऱ्या कपाळावरून गालांवर लोंबल्या होत्या. झाकल्या डोळ्यांच्या पापण्यांचे केस असूनही दिसत नव्हते. गालांची तर नुसती हाडे दिसत होती. हाडकुळ्या खांद्यांवरून आलेल्या मळक्या चोळीची तिने जेमतेम गाठ मारली होती; कमरेला अर्धे-मुर्धे , विटके लुगडे गुंडाळले असते आणि तिने त्याचा कसाबसा काचा खोचला होता. तिने आपले दहा-बारा वर्षांचे पोरसवदा अंग जमिनीवर टाकून दिले होते. तिच्याकडे पहिले तर वाटावे, की ही केव्हाची गाढ झोपी गेली असावी. पण तसे नव्हते. तिने काही क्षणांपूर्वीच अंग टाकले होते. बाजारात ती एक तासापूर्वी तर आली होती.


आपल्या आजी बरोबर ती मोठ्या पहाटेच ठेक्याच्या वावरण्यात गेली होती. तिच्या कमरेएवढ्या उंच वाढलेल्या गवताच्या पेंढ्या तिला बांधू लागली होती. सोनेगावजवळच्या वावरात त्या वेळी कुणी चिटपाखरूही नव्हते. तिच्या आजीच्या सप सप चालणाऱ्या विळ्याचाच आवाज त्या शांततेचा भंग करत होता. मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला साथ करी. चांगले दोन-अडीच तास खपल्यावर त्यांचे भारे तयार झाले होते. ते ओल्या गवताचे लवलवते भारे डोक्यावर घेऊ त्या दोघी निघाल्या होत्या. दोन-अडीच मैल चालल्यावर कुठे अजनी जेलचे नाके दिसले, अन अखेर बाजार…



तिथे पोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती. मग आपली भाकरीची गठडी घेऊन ती त्या सार्वजनिक नळावर गेली. हातपाय धुऊन भाकरी खायला बसली. एवढेसे तुकडे चघळत ती भाकरी खात होती. ती एक घास तोंडात घाली व भोवतालच्या साऱ्या पसाऱ्यावर आपली नजर भिरभिर फिरवी. जणू त्या भाकरीच्या तुकड्याबरोबर भोवतालचे सारे जीवन ती तोंडी लावत होती.


अर्रर्रर्र… केवढ्या भर्रर्रर्रदिशी धावतात या मोटारी ! अन फसदीशी पाणी उडवतात मेल्या… या भाजीवाल्या चालल्या. सोनेगावच्याच तर दिसतात या… हो तर काय ! ती नाही का गोप्याची माय… भल्ली भरली टोपली भेंड्यांनी ! हाऱ्याच्या वर कशा गोलच गोल उभ्या करून दिल्यान… जसे काय शिपाईच… त्या उडानखटुल्याच्या तळापाशी नाही का उभे राहत संगिनी घेऊन तशा. अन त्या मोटारी तर अशा भारी… अवघा रस्ता भरून टाकतात; बाजूंनी जाणाऱ्या माणसालाही आपल्या वाऱ्याने ओढून नेतात जणू… लोणीवाल्या उतरल्या बरं त्या झाडाखाली निंबाच्या… रामा रामा… केवढा कलकलाट त्यांचा ! अडत्याशी झुंज घालतात जणू ! अहा ! काय न्यारा घमघमाट सुटलाय…


तिने मागे वळून पहिले. तिच्या पाठीशीच शेव-भजीवाल्याची राहुटी होती. शेवेचा असा चरचरीत घाणा घातला होता त्याने ! दमडीचा भाकरीचा घास हातातच राहिला. विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या तेवढ्या अंतरावरून त्याच्या कढईकडे ती पाहत राहिली. कोणीतरी मुंडासेवाला बाबा आला. त्याने दोन पैसे दिले. कागदात मूठ भरून शेव घेतली. पलीकडेच चार हातांवर जाऊन तो खात बसला. दमडीने सावकाशपणे डोळे वळवले. आपल्या भाकरीच्या फटकुराकडे पहिले व हळूच हात उचलून तोंडात घातला. तिच्या जिभेवर जणू शेवेचे तुकडे फिरत होते!


Damadi Balbharti

भाकरी खाऊन झाल्यावर तिने उठून आपले फटकूर झटकले. नळावर जाऊन कोपरापर्यंत पाण्याचे ओघळ घळाघळा जाईतो ती ओंजळीने पाणी प्याली. फटकुरालाच हाततोंड पुसून चिंचेच्या झाडापाशी आली. मग तेच फटकूर चुंबळीसारखे उशाशी घेऊन झाडाच्या मुळांवर डोके ठेऊन झोपली. पाच मिनिटांतच तिला भोवतालच्या जगाचा विसर पडला आणि ती स्वप्नाच्या जगात शिरली.


त्या स्वप्नात ती अखंड चालत होती. पावलामागून पाऊल टाकत होती. दृष्टीची झेप जाईल तिथवर तिला हिरवेगार गवतच दिसत होते. त्यातून वाट काढत, डोक्यावर जड, लांब भारा सावरत ती एकसारखी चालली होती. बरोबर आजी नव्हती, कुणीच नव्हते.


तिने डोक्यावर सहज हात नेला आणि काय मजा ! तिच्या डोक्यावर गवत कुठे होते? काहीतरी लांब, पिवळे, कडक… गरम. त्याचाच सबंध भारा तिच्या डोक्यावर कोणीतरी दिला होता. अहाहा ! शेव ! खमंग, कुरकुरीत गरम शेव होती ती. तिच्या डोक्यावर होती. तिच्या हातानेच तिने धरली होती. त्यातली शेव खावी आपण. तिचा हात पुढे सरकला. पण लगेच भान आले, की डोक्यावरचा भारा दुसऱ्याच कोणाला द्यायचा असतो ना? त्या मुंडासेवाल्या बाबाला……. त्याच्याजवळ पैसे आहेत ना द्यायला.



दमडी (Damadi) निजली होती. एवढीही हालचाल होत नव्हती. तिच्या अंगावर चिंचेची पाने मधून मधून पडत होती. आकाशात ढगांची शिवाशिव चालली होती. वाऱ्याचे झोत येत-जात होते. मध्येच ऊन पडे, तर घटकेत वाटे, आता पाऊस कोसळणार. असाच एक थंड वाऱ्याचा झोत आला व चिंचेची गार पाने तिच्यावर बरसली. पण तिचा स्वप्नप्रवाह चालूच होता, ती पुन्हा चालत होती.



आता स्वप्नात एक थबथबलेला गवताचा भारा तिच्या डोक्यावर होता. पायांत गोळे आलेले… सगळीकडे अंधार. प्रत्येक पावलाबरोबर भोवताली सळसळणारे गवत. तेवढ्यातच तिला स्वप्नात आजी दिसली. तिच्या मागे जायचे ना? आजी तर फाटकातून आत चालली. चला चला. बंगल्यावर चंदी आहे वाटते ! दमडी फाटकातून आत शिरली. मागले दार उघडले गेले. दमडी (Damadi) भारा सावरीत गोठ्याकडे गेली. आजी भारे सोडत होती, तोवर दमडी (Damadi) गोठ्याच्या खांबाशी टेकून उभी राहिली. पण तिची दृष्टी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत शिरली. रसरशीत निखारे पेटले होते. त्यांची ऊब तिच्या दृष्टीलादेखील जाणवत होती.


अरेच्या, कुणीतरी भाकरी भाजतंय वाटतं. अन भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा केवढा खमंग वास पसरला होता. तेवढ्यात तिच्यापेक्षा एखाददुसऱ्या वर्षानेच लहान असलेल्या मुलीचा आतून आवाज आला, ‘ माझ्या भाकरीवर दूध पाहिजे, दूध !’ पाहूया तरी ! पण आजी तर फाटकातून बाहेर पडली, म्हणून दमडीही निघाली. आजी मागोमाग चालू लागली. अंधारातून….. गवतातून…..


आता तिला स्वप्नातच कुठले तरी गाव दिसले. सोनेगाव का ते? सोन्याचे गाव ! मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चिंचोळ्या पायवाटेने वरवर चालली होती ती. मग शितळादेवीचे देऊळ लागले. पलीकडे मारुतीचे…… तो पाहा तो विठू, नारळ फोडतोय वाटतं तो तिथं… ‘मला दे की रे थोडं.’ ‘हो तर, तुझ्यासाठीच तर फोडतो.’ खोबऱ्याचा तुकडा, पांढरा स्वच्छ करकरीत. दाताखाली दाबला तर दूध निघतं नुसतं. दमडीने खोबरे घ्यायला हात चटकन पुढे केला. विठू म्हणत होता, ‘हो हो. हा सगळाच्या सगळा तुकडा तुझ्यासाठीच आहे, दमडे. घे, सगळा घे, दमडे!’


पण त्याच वेळी ‘दमडे… दमडे…’ तिच्या आजीच्या हाका आल्या. भारे विकून, मीठ-मिरचीचा बाजार करून ती दमडीला (Damadi) उठवायला हाका मारीत होती. दमडी (Damadi) जागी झाली. पण डोळ्यांपुढे ते भाकरीचे, दुधाचे, खोबऱ्याचे स्वप्न तरळतच होते. क्षणभर पडल्या-पडल्याच ती आजीकडे पाहत राहिली. आजीने पुन्हा हाक मारली, ‘ दमडे, अशी काहून पाहतं ग? ऊठ नं आता?’ दमडी (Damadi) उठली. आपले भाकरीचे फटकूर झटकून घेतले व ती आता खरोखरच चालू लागली. शेवेचा खमंग वास घेत बाजारचा रस्ता तुडवू लागली.


दीडदमडीचा चालत जीव तो… असाच पुढल्या बाजारी चालत येईल व त्याच्या पुढल्या बाजारी…. आणि त्याच्या

 पुढल्याही.


क्रेडिट बालभारती


सोमवार, १ जून, २०२०

गोट्या... प्रेरणदायी विचारांचा एक स्रोत.

               
             
                                                काय तुम्हाला मित्र आहे ? असा कोणी प्रश्न विचारताच कोणीही स्मित हास्य करून त्याच प्रश्नाला प्रती प्रश्न म्हणून विचारेल की, " या जगात असा कोणी आहे का ज्याला मित्र नाहीत?" आणि नंतर स्वतः च आपल्या मित्रांची लांबलचक यादी सांगेल कोणत्याही मित्राचं नाव न विसरता. मित्र म्हंटल की आपल्याला आपल्या सर्वात जवळच्या मित्रांची आठवण येते आणि आपण काही क्षणातच आपल्या मित्रांबोबरच्या आठवणींमध्ये रमून जातो. त्यांचा विचार आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य देऊन जातो. आपलं आयुष्य सुंदर बनवण्यासाठी अनेक वस्तूंची आणि सुख सुविधांची गरज असते, परंतु एक सच्चा मित्र भेटला की बाकी सर्व गोष्टी आपोआपच जुळून येतात. 
                    या जगामध्ये असा कोणीच नाही ज्याला मित्र नाही किंवा नव्हते किंवा नसावे असे वाटावे. खूप कमी लोक असे असतात ज्यांना कोणाची सोबत नको असते. प्रत्येकाला भरपूर असे मित्र असतात. तुम्ही जर कोणाला विचारलं की तुला किती मित्र आहेत तर तो म्हणेल की , " मला शनिवार रविवार सुट्टी असते तेंव्हा भेटू." सांगायचं म्हणजे त्याचे मित्र आणि त्याच्या मित्रांविषयी सांगायला इतके आहे की दोन किंवा पाच मिनीटांन मध्ये सांगून होणार नाही. प्रत्येकालाच आपला मित्र निस्वार्थी असावा, आपला मित्र श्रीकृष्णासारखा असावा असे वाटते. पण सगळेच मित्र श्रीकृष्णासारखे नसतात आणि म्हणूनच की काय काही मित्रांकडून वाईट अनुभवही येतो, पण काही मित्र खरोखरच श्रीकृष्णासारखे असतात आपल्यासाठी सारथी होतात, प्रत्येक अडचणींमधून सुखरूप बाहेर पडण्यास मदत करतात, चांगल्या वाईटाची जाणीव करून देतात, योग्य निर्णय घेण्यास भाग पाडतात, आपण जर हरलो तर त्याच अपयशाला यशामध्ये बदलण्याचे सामर्थ्य देतात, आपल्या डोळ्यांमधून आसवांचा थेंब बाहेर येण्याअगोदरच त्यांचे हात डोळे पुसण्यासाठी पुढे असतात. सांगायचे तात्पर्य असे की ज्यांच्यामुळे आपले आयुष्य सफल होते असे मित्र कोणाला नकोय? असे मित्र सर्वांनाच नेहमी हवेहवेसे वाटतात.
                  मलाही असे भरपूर मित्र आहेत. खरंच जीवाला जीव देणारे आहेत,मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती असा असतो जो आपल्या नकारात्मक विचारांना बदलून आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण करतो आणि आपल्याला परिस्थितीशी दोन हात करायला लावतो. असाच माझा एक मित्र म्हणजे 'गोट्या'. त्याचं नाव तसं भागवत आहे पण, गावी त्याला सगळे गोट्याच म्हणतात आणि याच कारणामुळे आमच्या मित्र परिवारामध्ये गोट्या हेच नाव प्रचलित आहे. आणि कधी-कधी तर असं होतं की, आम्ही याचं खरं नाव म्हणजे भागवत आहे हेसुद्धा विसरून जातो. आज माझ्या मित्रा विषयी सांगण्याचं कारण असे की हा तोच व्यक्ती आहे जो कोणाला श्रीकृष्ण भासेल तर कोणाला कर्ण. गोट्या नेहमीच सकारात्मक विचारांचा धनी राहिला आहे. आणि नकारात्मक विचार त्याच्या पायाजवळ ही येत नाहीत. जर तुमचे विचार नकारात्मक असतील किंवा होत चालले असेल तर तेव्हा मात्र तुम्हाला अशा मित्राची आवश्यकता आहे.
                    पदवी शिक्षणाच्या वेळी खूप उशिराने म्हणजे शेवटच्या वर्षी मिळालेला हा मित्र. आता असे वाटते की लवकर भेटला असता तर अजून चांगले झाले असते, असो पण जेवढा वेळ तो सोबत राहिला त्याने कधीच कोणाचा आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार कमी होऊ दिले नाहीत. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सकारात्मकता बघून तो माझा मित्र असल्याचा अभिमान वाढत जातो. मला एका परीक्षेसाठी बसायचे होते परंतु मी परीक्षा फॉर्म भरायच्या अगोदरच हार मानली होती मी म्हणालो की, "नाही यात मी पास होणार नाही." तेव्हा तो म्हणाला, "तू फॉर्म भर काय माहित तू पास पण होशील." आणि मग मी  फॉर्म भरला आणि पासही झालो. या यशाचे सर्व श्रेय माझ्या मित्राला जातं. तुमच्यापैकी बरेच जण पदवीसाठी किंवा इतर शिक्षणासाठी घराच्या बाहेर राहिला असाल. तर तुम्हाला चांगलंच माहिती असेल की, आपल्या जवळपास कोणत्या मंगल कार्यालय मध्ये लग्न असेल तर आपण कधी जायचं सोडत नसतो. काय तुम्ही कधी असं केलंय का,विना निमंत्रण  पत्रिकेचे तुम्ही एखाद्या लग्न ठिकाणी गेलात आणि पोटभर जेवून आलात? असाच एक अनुभव माझ्या मित्रासोबतचा म्हणजे गोट्या सोबतचा आहे. आमची मेस बंद होती आणि तसं पण मेस ही मेसच असते तुम्हा सर्वांना ठाऊकच असेल. त्यादिवशी मेस बंद असल्यामुळे रात्रीच्या जेवणाचा प्रश्न होता आणि खिशात कोणाच्याच पैसा नव्हता. मग गोट्याच म्हणाला, "आज माझ्या मित्राचं लग्न आहे, त्याने आपल्याला बोलावले आहे. रात्रीचे जेवण तिथेच करू." मग काय बॅग च्या तळाशी  पडलेला  एक चांगला शर्ट काढला. ( फक्त म्हणायला चांगला.)  मस्त स्वतःच्या मित्राच्या लग्नात जावे तसे निघालो. कोणी - कोणी तर तसेच झोपेतून उठून फक्त तोंडावर पाणी मारुन, तर कोणी पावडर लावून निघाले. लग्न ठिकाणी गेल्यावर मी गोट्याला म्हणालो, "आपण तुझ्या मित्राला म्हणजे नवरदेवाला भेटू." परंतु तो म्हणाला, "तिथे आता खूप गर्दी आहे, आपण जेवण करून घेऊ." मग आम्ही पाच-सहा जण मित्र जेवणाच्या रांगेत उभा राहिलो. आयुष्यात कधीही जे बघितलं पण नव्हतं असे पदार्थ समोर होते, जणू ते आम्हां सर्वांना खुणावून बोलवत होते. त्या सर्व पदार्थांना बघून आमची भूक अजूनच वाढली. सर्वांनी पोटभर जेवण करून घेतलं, मग मी गोट्याला पुन्हा एकदा म्हणालो, "चल आता भेटू तुझ्या मित्राला." मग पुन्हा त्याने न ऐकल्यासारखं करून आम्हाला आईस्क्रीम खायला घेऊन गेला भरपूर प्रकारच्या होत्या. पोटामध्ये आईस्क्रीम adjust करत दुसरा एक मित्र गोट्याला म्हणाला, "चालायचा का तुझ्या मित्राकडे ?" तेव्हा तो म्हणाला, "अरे आपण तर फुलांचा गुच्छ आणायचं विसरलो." मग आम्ही तसेच बाहेर जाऊन फुलांचा गुच्छ आणावा म्हणून, मी आणि माझे सर्व मित्र आम्ही बाहेर आलो. आणि येतानाही रिकाम्या हाताने नाही तर, मस्त पानाचा विडा घेऊन आम्ही बाहेर आलो. पानाचा विडा खात-खात आम्ही थोड्या अंतरावर गेल्यानंतर पुन्हा एकाने विचारलं, " फुलांचा गुच्छ तर त्या बँकेच्या बाजूला भेटतात. आपण दुसरीकडे  इकडे कुठे चाललो आहे?" तेव्हा मात्र गोट्याने  खरं सांगितलं. "तुम्हाला सर्वांना भूक लागली होती आणि मलाही भूक लागली होती." आमच्यातला एकजण म्हटला, "अरे पण जर आपल्याला पकडलं असतं तर?" तेव्हा तो निवांतपणे म्हणाला, "पकडले असतं तर ना. पकडले गेलो तर नाही ना? आणि जरी पकडले असते तर काय केलं असतं त्यांनी, फक्त काढून दिलं असतं, मारून तर टाकलं नसतं ना? Be Positive यार." असे म्हणून तो  निवांतपणे रूम च्या दिशेने निघाला. आणि आम्ही त्याच्या पाठोपाठ निघालो. अशा  अनेक घटना घडत राहिल्या आणि तो व्यक्ती, तो माझा मित्र, माझा सारथी बनत गेला. 
                        जरी ही गोष्ट कोणाला छोटी वाटत असली तरी, पण या घटनेनंतर मी मात्र गोट्याचा फॅन झालो आणि ठरवलं की, कधीच नकारात्मक विचारांना आपल्या मनामध्ये थारा द्यायचा नाही. घटना कोणतीही असो आपण त्यामधून काय घेतो हे महत्त्वाचं. खरंच गोट्या कडून भरपूर काही शिकण्यासारखं आहे.